प्रेयसीला जीवे ठार मारणा-यास जन्मठेप

0
33
Gadchiroli today 
प्रेयसीला जीवे ठार मारणा-यास जन्मठेप
– अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
गडचिरोली :  प्रेयसीवर अत्याचार करुन तिला जीवे ठार मारणा-या आरोपीस अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यु. एम. मुधोळकर यांनी जन्मठेप व 1 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. प्रदीप बालसिंग हारामी रा. ढोलडोंगरी ह. मु. अंतरगाव ता. कोरची असे आरोपीचे नाव आहे.

2 फेब्रुवारी 2018 रोजी कुरखेडा पोस्टेचे पोउपनि कृष्णा सहारे हे नेहमीप्रमाणे आपल्या कर्तव्यावर जात असताना त्यांना माहिती मिळाली की, डिप्राटोला ते तळेगाव जाणा-या कच्च्या रस्त्याच्या बाजुला एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तेथे जावून चौकशी केली असता, सदर महिला ही अंदाजे 18 ते 20 वर्षांची असून तिचा गळा हत्याराने अर्धवट चिरलेला होता. सदर हत्येबाबत कुरखेडा पोस्टेत गुन्हा नोंद करुन तपास सुरु केला. सदर महिलेजवळ ट्रॅव्हल्सचे तिकीट मिळाले. त्या तिकीटावर मोबाईल क्रमांक टाकण्यात आला होता. त्या मोबाईलचा एसडीआर काढला असता, तो मोबाईल आरोपीच्या मित्राचा होता. आरोपीच्या मित्राला विचारपूस केली असता, तो क्रमांक माझाच असून तो मी माझा मित्र आरोपी प्रदीप हारामी याला दिल्याचे त्याने सांगितले. यावरुन आरोपीला ताब्यात घेवून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. 
चौकशीत आरोपीने सांगितले की, मृतक ही आरोपीची प्रेयसी होती. ती पुणे येथे नोकरी करीत होती. ती आपल्या गावाजवळील कोटगूल येथील मंडईकरीता पुणे येथून येत असताना आरोपीने 31 जानेवारी 2018 रोजी 5.30 वाजतादरम्यान देसाईगंज येथून तिला सोबत घेतले. डिप्राटोला व तळेगाव या कच्च्या रस्त्याच्या बाजुला नेले. त्याठिकाणी आरोपीने मृतकासोबत शारिरीक संबंध केले. याठिकाणी तिने त्याच्याजवळ लग्नाचा हट्ट धरला. मात्र आरोपीचे यापूर्वीच कॉलेजमधील मैत्रिणीशी प्रेमसंबंध असल्याने व मृतक ही लग्नासाठी तगादा लावत असल्याने त्याने तिचा गळा दाबला. ती मृत झाली किंवा नाही, यासाठी त्याने पुन्हा तिच्या गळ्यावर ब्लेडने वार करुन जिवानीशी ठार केले. याप्रकरणी आरोपीला 3 फेब्रुवारी 2018 रोजी अटक करण्यात आली. आरोपीविरुद्ध कुरखेडा पोस्टेत कलम 302, 376(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 
पोलिसांनी तपास पूर्ण करुन आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. फिर्यादी व इतर साक्षीदाराचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन तसेच प्रकरणातील परिस्थितीजन्य पुरावे लक्षात घेवून आज अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यु. एम. मुधोळकर यांनी आरोपी प्रदीप हारामी यास कलम 302 भादविमध्ये जन्मठेप व 1 लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. कलम 376(1) अन्वये आोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल अनिल प्रधान यांनी काम पाहिले. तसेच गुन्ह्याचा तपास सपोनि गजानन पडळकर यांनी केला. कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी खटल्याच्या कामकाजात योग्य भूमिका पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here