बचत गटाच्या नावाखाली अवैध सावकारी : दोन महिलांना अटक

0
30
Gadchiroli today
बचत गटाच्या नावाखाली अवैध सावकारी : दोन महिलांना अटक  
-आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त 
गडचिरोली : जिल्हा मुख्यालयालगत असलेल्या नवेगाव येथे महिला बचत गटाच्या नावाखाली अवैध सावकारी करणा-यांच्या घरावर सहकार विभागाने धाड टाकित दोन महिलांना गजाआड केले आहे. यावेळी दोन्ही महिलांकडून मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली. 

जप्त करण्यात आलेले आक्षेपार्ह कागदपत्रे

 

 जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, तथा सावकारांचे निबंधक गडचिरोली प्रशांत धोटे यांचे आदेशान्वये शासनाकडे बेकायदेशीर अवैध सावकारीच्या अनुषंगाने, 20 जानेवारी रोजी तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीनुसार शहरापासून जवळच असलेल्या नवेगाव येथील सुयोग मोनिका किशोर खनके व संगीता निंबाळकर या महिला बचत गटाच्या नावाखाली अवैध सावकारी करीत असल्याची माहिती प्राप्त झाली. या अनुषंगाने गडचिरोलीचे सहाय्यक निबंधक विक्रमादित्य पितांबर सहारे यांनी मोनिका किशोर खनके यांचे घरी तर चामोर्शी सहाय्यक निबंधक पंकज नारायण घोडे यांनी संगीता निबांळकर यांचे घरी सकाळी एकाच वेळी धाडसत्र राबविले. याकामी स्थानिक पोलिस विभागाचेही सहकार्य मिळाले. यावेळी दोन्ही महिलांच्या घरून मोठ्या प्रमाणात कर्ज देण्यासंदर्भाचे आक्षेपार्ह कागदपत्र आढळून आली. सदर कागदपत्रे चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. संबधितांविरुध्द सावकारी अधिनियम 2014 चे कलम 16 अंतर्गत कारवाई केली जात असल्याचे सहकार विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे. सदर कागदपत्रांची चौकशीनंतर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. बेकायदेशीर तक्रारीचे अनुषंगाने काही तक्रार असल्यास जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, गडचिरोली तसेच तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या कार्यालयात तक्रारदारांनी पुढे येवुन तक्रार दाखल करावी. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे यांनी केले आहे. 

यांनी केली कारवाई 
ही कारवाई गडचिरोलीचे जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे, यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली गडचिरोलीचे सहाय्यक निबंधक विक्रमादित्य सहारे व चामोर्शी सहाय्यक निबंधक पंकज नारायण घोडे यांचेसह सुशिल वानखेडे, डी. आर. बनसोड, विजय पाटील, लोमेश रंधये, सचिन बंदेलवार, अनिल उपासे, वैभव निवाणे, हेमंत जाधव शैलेंद्र खांडरे, ऋषीश्वर बोरकर, शालीकराम सोरते, शांताराम कन्नमवार, अशोक शेळके, उमाकांत मेश्राम, शैलेश वैद्य, तुषार सोनुले, प्रकाश राऊत, स्मिता उईके, शोभा गाढवे, अनिता हुकरे, धारा कोवे, कविता बांबोळे यांनी यांनी पार पाडली. 

 ही आक्षेपार्ह कागदपत्रे घेतले चौकशीसाठी ताब्यात
शोध मोहीमेदरम्यान मोनिका किशोर खनके यांचे घरी 12 स्टॅम्प पेपरसह छायांकित प्रती, 7 कोरे धनादेश, 1 धनादेश बुक, 2 साध्या पेपरवर केलेला करारनामा, रकमेच्या नोंदी असलेल्या 21 चिठ्ठया, 3 रजीस्टरची पाने, 10 हिशोबाच्या नोंदवहया, 6 बॅंक पासबुक, अनेक व्यक्तीच्या नावाने असलेल्या /मतदानकार्ड/ पॅनकार्ड /आधारकार्डांच्या इलेक्ट्रिक बिलांच्या 24 छायांकित प्रती, विक्री पत्र, मालमत्तापत्र (सेलडिड) तसेच तर आनुषांगीक 39 कागदपत्रे आढळून आली. तसेच संगीता निबांळकर यांचे घरी 6 स्टॅम्प पेपर, 2 डाय-या 12 कोरे धनादेश, 3 सातबारा नमुने, 5 सेलडिड नमुने, 21 चिठ्ठया, 6, विक्रीपत्र, 5 मालमत्तापत्र (सेलडिड) आदी आक्षेपार्ह कागदपत्रे चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली. 
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here