‘या’ गावाला चार वर्षानंतर घडले लालपरीचे दर्शन

0
35

बससह उपस्थित ग्रामस्थ व पोलिस अधिकारी

– पोलिस प्रशासनाचा पुढाकार 
भामरागड : तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या बामनपल्ली गावातील बससेवा मागील चार वर्षापासून बंद पडली होती. यामुळे या परिसरातील 25 गावातील नागरिकांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत होता. या खडतर प्रवासामुळे नागरिकांचे हाल होत होते. नागरिकांची ही समस्या लक्षात घेत पोलिस प्रशासनाने पुढाकार घेत एसटी महामंडळ प्रशासनाने बससाठी पाठपुरावा केला. या प्रयत्नाना यश आले असून सदर बससेवा पूर्ववत सुरु करण्यात आली आहे. तब्बल चार वर्षानंतर बामनपल्ली परिसरातील नागरिकांना एसटीचे दर्शन घडल्याने त्यांच्या चेह-यावर हसु उमलले. 
 तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या बामणपल्ली परिसरातंतर्गत बामनपल्ली, येचली, मन्नेराजाराम, दुबागुडम आदींसह जवळपास 20 ते 25 गावातील नागरिकांना विविध कामांसाठी तसेच शासकीय कामकाजासाठी तालुका मुख्यालय गाठावे लागते. तसेच रुग्णांना उपचारासाठी भामरागड तालुकास्थळाचाच मोठा आधार होतो. मात्र मागील चार वर्षापासून या मार्गावरील एसटी महामंडळाची बससेवा बंद असल्याने नागरिकांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत होता. याचा गैरफायदा खासगी वाहनधारक घेत होते. त्यांचेद्वारे प्रवाशांकडून मनमानी तिकीट आकारले जात होते. यामुळे नागरिकांना मानसिक, आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. ही बाब या परिसरातील नागरिकांनी पोलिस प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. मन्नेराजाराम पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी उमेश कदम यांनी बस सुरु करण्यासाठी एसटी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याने अहेरी-बामणपल्ली-भामरागड ही बसफेरी पुन्हा सुरु करण्यात आली. तब्बल चार वर्षानंतर पोलिस प्रशासनाच्या पुढाकाराने पुर्ववत बससेवा सुरु झाल्याने नागरिकांचा प्रवास सुकर होण्यास मदत झाली आहे.
सदर बससेवा पूर्ववत सुरु करण्यासाठी पोमके हद्दीतील नागरीकांनी पोलिस प्रशासनाकडे साकडे घातली. नागरिकांची अडचण लक्षात घेता मन्नेराजाराम पोमके प्रभारी अधिकारी उमेश कदम यांनी एसटी महामंडळाकडे पाठपुरावा केला. अखेर पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक प्राणहिता, उपविभागीय पोलिस अधिकारी भामरागड यांच्या मार्गदर्शनात परिवहन विभागाच्या वतीने सदर बससेवा पूर्ववत सुरु करण्यात आली. स्थानिक पोमके मन्नेराजाराम येथील अधिकारी व अंमलदारांच्या प्रयत्नाने सदर बससेवा सुरु झाल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here