गडचिरोलीच्या युवकांना मिळाली तेलंगणा व राजस्थानच्या राज्यपालांशी संवाद साधण्याची संधी

0
31

आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रम 
गडचिरोली TODAY 
गडचिरोली  : नेहरू युवा केंद्र आणि केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बलाच्या संयुक्त विद्यमाने 14 व्या आदिवासी युवा आदान- प्रदान कार्यक्रम अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील, विशेषतः एटापल्ली आणि भामरागड तालुक्यातील एकूण 330 युवक भारतातील वेगवेगळ्या 14 राज्यांमध्ये भेट देत आहेत. त्याअंतर्गत 20  युवकांनी 21 ते 27 फेब्रुवारी दरम्यान हैदराबाद आणि 20 युवकांनी जयपुर येथे भेट दिली. यादरम्यान युवकांना राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र आणि तेलंगणाच्या राज्यपाल तामिलीसाई सौन्दरराजन यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
 

नेहरू युवा केंद्र आणि केंद्रीय रिजर्व पोलीस बल आदिवासी युवकांच्या विकासासाठी आणि त्यांचे एकत्रीकरण करण्यासाठी 2006 पासून ‘आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रम’ आयोजित करत आहे. या कार्यक्रमाचा मुख्य हेतू हा भारतातील विविध राज्यातून आलेल्या युवकांना एकमेकांशी संवाद साधून आपल्या संस्कृतीची देवाण-घेवाण करणे, तसेच आदिवासी तरुणांना भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची जाणीव करून देणे, आदिवासी तरुणांना इतर क्षेत्रात प्रवृत्त करणे हा आहे.  कार्यक्रमाच्या प्रमुख उपक्रमांमध्ये घटनात्मक अधिकारी¸मान्यवर आणि प्रतिष्ठित व्यक्तींसोबत संवाद सत्रे¸ पॅनल चर्चा¸ व्याख्यान सत्र¸ आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत उपक्रम¸ वक्तृत्व स्पर्धा¸ कौशल्य विकास¸करिअर मार्गदर्शनाशी संबंधित उद्योग भेटी¸ महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक स्थळांच्या भेटींचा समावेश आहे. हा कार्यक्रम घडवून आणण्यामध्ये सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक जे. एन. मीना त्याचप्रमाणे जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे यांचे मुख्य योगदान आहे. या युवकांना प्रवासादरम्यान साथ देण्यासाठी एस्कॉर्ट म्हणून सोबत गेलेले सुख राम, अनिता गौतम,जे श्रीनिवास राव, कांता कुमारी रॉय यांचे योग्य सहकार्य मिळाले.

 रेला नृत्याचे केले सादरीकरण

युवकांनी गडचिरोलीतील संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असलेल्या रेला नृत्याचे सादरीकरण केले. राजस्थान येथे गडचिरोली चमू चा प्रथम तर हैदराबाद येथे तृतीय क्रमांक आला. प्रथम क्रमांकास दहा हजार रुपये व तृतीय क्रमांकास दोन हजार रुपयांचे पारितोषिक माननीय राज्यपाल महोदय यांच्या हस्ते युवकांना प्रदान करण्यात आले. स्पर्धेतील सर्व सहभागी विजेत्यांचे जिल्हाभरातून कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here