विजेच्या समस्येने शेतकरी त्रस्त : काँग्रेसची वीज कार्यालयावर धडक

0
31

उपविभागीय अभियंत्यांना निवेदन देताना तालुका कॉंग्रेसचे पदाधिकारी

GADCHIROLI TODAY 
आरमोरी : शेतकऱ्यांच्या वीज समस्येसह वासाळा, चामोर्शी माल परिसरातील वाघाचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने वीज वितरण व वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयावर धडक देवून विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
 आरमोरी तालुक्यातील वासाळा, चामोर्शी माल, वनखी, ठाणेगाव, डोंगरगाव, शिवणी, करपडा, लोहारा आणि इतर क्षेत्रातील शेतकऱ्यांनी नदी, नाल्यावर तसेच विहीर, बोअरवेलवर कृषीपंप बसवून उन्हाळी धान, मका पिकाची लागवड केली आहे. सध्या काही शेतकऱ्यांचे रोवणे सुरु आहे. तर काहींचे धान व मका गर्भात आहे. त्यामुळे पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. मात्र वीज वितरण कंपनीने भारनियमन सुरु करुन शेतकऱ्यांना केवळ आठ तास वीज उपलब्ध करुन दिली जात आहे. ती सुद्धा रात्रीच्या वेळेस वीज देण्यात येत असल्याने पाणी लावण्यासाठी रात्री 12 वाजता शेतावर जाणे शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे धान, मका पीक करपत आहेत. तसेच मागील काही दिवसांपासून या परिरात वाघाची दहशत असल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट आले आहे. वाघाच्या भीतीने रात्री शेतावर जावून पाणी देणे शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या कृषीपंपाना 24 तास वीज पुरवठा करून वनविभागाने परिसरातील वाघाचा व जंगलातील रानडुकराचा बंदोबस्त करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या कृषीपंपासाठी 24 तास वीज पुरवठा न केल्यास तसेच वाघाचा बंदोबस्त न झाल्यास 13 मार्च रोजी दुपारी 12 वाजता जुना ठाणेगाव फाट्यावर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा वीज वितरण कंपनी आरमोरीचे उपविभागीय अभियंता व वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी पंसचे माजी उपसभापती विनोद बावणकर, राजू सामृतवार, वामन निंबोळ, रामाजी मशाखेत्री, भिमराव ढवळे, विजु धारणे, नानाजी लाकडे उपस्थित होते.
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here