ट्रॅक्टर अपघातात 40 महिला मजूर जखमी

0
32

– सिरोंचा तालुक्यातील मोयाबिनपेठा गावाजवळील घटना

गडचिरोली POST
गडचिरोली : मिरची तोडाई करुन गावाकडे परत येत असतांना ट्रॅक्टर ट्राली उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात ट्रॉलीमधील 40 महिला मजूर जखमी झाल्याची घटना, सोमवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास सिरोंचा तालुक्यातील मोयाबीनपेठा गावापासून एक किमी अंतरावर घडली. सुदैवाने यात कोणतीही जिवतहानी झाली नसली तरी 12 महिलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, मोयाबिनपेठा येथील लासमय्या दर्गम यांच्या शेतात मिरची तोडाईचे काम सुरु आहे. मिरची तोडाईकरिता पिरमेडा येथील 40 महिला मजूर म्हणून काम करीत आहे. सोमवारी नेहमीप्रमाणे महिला मजूर मिरची तोडाई करुन ट्रॅक्टरने पिरमेडा स्वगावी जात होत्या. मोयाबीनपेठापासून काही अंतरावर ट्रॅक्टरचे चाक खड्ड्यात गेल्याने वाहन चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॉली रस्त्यालगत उलटल्या गेले. यात 28 महिला किरकोळ तर 12 महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती प्राप्त होताच रेगुंठा पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी विजय सानप यांच्या नेतृत्वात पोलिस पथकाने तत्काळ घटनास्थळ गाठले. संबंधित शेतक-यांसह पोलिस पथकाद्वारे जखमी महिलांना तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र मोयाबिनपेठा येथे उपचारार्थ हलविण्यात आले. प्राथमिक उपचाराअंती जखमींना सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. यातील अतिगंभीर 1 महिलेला तेलंगणा राज्यातील मंचेरियल येथे तर 3 महिलांना अहेरी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ रवाना करण्यात आल्याची माहिती आहे.
सदर अपघातात सुरक्का बोंदय्या जिल्हापली, लिंगक्का दुर्गय्या चेंनुरी, पेंटक्का किष्टय्या चेंनुरी, सत्यक्का मैसल्ला जिल्हापेली, सुकना व्येंकटी चेंनुरी, कमला राजय्या चेन्नुरी, लक्ष्मी लचन्ना चेन्नुरी, कमला व्येंकटी चेंनुरी, प्रेमिला बापू चेंनुरी, चिन्नक्का रामकिष्टू चिलमुला, प्रेमिला शंकर चेन्नुरी, रामक्का पोचम्मा कुंटाला सर्व रा. पिरमेडा यांचा समावेश आहे. यातील गंभीर अशा एका महिलेवर मंचेरियल (तेलंगणा) तर 3 महिलांना अहेरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार सदर महिला मजूर नेहमीच मोयाबिनपेठा येथे मिरची तोडाईसाठी जात असल्याची माहिती आहे. घटनेच्या वेळी ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक महिला प्रवास करीत होत्या. आधीच सिरोंचा मार्गाची दैनावस्था असल्याने रस्त्यातील भल्यामोठ्या खड्ड्यात ट्रॅकर गेल्याने चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटून ट्राली रस्त्यालगत उलटल्या गेली. दैव बलवत्तर म्हणूनच सदर महिला रस्त्यालगतच्या झुडूपात तसेच गवतावर फेकल्या गेल्याने यात मोठी जीवितहानी झाली नाही. सुदैवाने या महिला मजूर ट्रॉलीखाली न आल्याने मोठा अनर्थ टळल्याचेही बोलल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here