सिनेस्टाईल पाठलाग करीत दारुतस्करांच्या मुसक्या आवळल्या

0
33

– १७ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
गडचिरोली POST
गडचिरोली : चामोर्शी पोलिसांनी हरणघाट मार्गावर लावलेले बॅरिकेट्स तोडुन पळ काढणाऱ्या वाहनाचा १०० ते १२५ किमी सतत पाठलाग करून पीकअप वाहनासह १७ लाख ८१ हजार ६०० रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त केल्याची कारवाई गडचिरोली पोलिस दलाने केली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला असून एकास अटक केली आहे.
चामोर्शी हद्दीतील दारू तस्कर शंकर अन्ना हा आपल्या सहका-यांच्या मार्फतीने चंद्रपुर जिल्हयातुन मोठया प्रमाणात दारुची खेप आणणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व कर्मचारी यांनी हरणघाट मार्गावर रात्रोदरम्यान सापळा रचुन नाकाबंदी लावली असता, दारुची वाहतुक करीत असलेल्या पिकअप वॅनने पोलीसांच्या इशा-यास न जुमानता बॅरिकेटस तोडुन पळ काढला. परंतु पोलीसांनी क्षणाचा विलंब न करता त्या वाहनाचा पाठलाग सुरु केला. अवैध दारु वाहतुक करीत असलेल्या वाहन चालकाने कारवाई टाळण्याकरीता आपल्या ताब्यातील वाहन जंगल मार्गाने तसेच पोस्टे चामोशी व पोस्टे आष्टी येथील वेगवेगळ्या गावात नेले. परंतु, पोलीसांनी १०० ते १२५ किमी सतत पाठलाग केल्याने वाहनचालक व त्याच्या साथीदाराने वाहन पोस्टे चामोर्शी हद्दीतील सोनापुर या गावाजवळ सोडुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलीसांनी पाठलाग करुन वाहनचालकासोबत असलेल्या अमित बारई रा. गौरीपुर ता. चामोर्शी यास ताब्यात घेतले. परंतु, वाहनचालक राकेश मशीद रा. गौरीपुर ता. चामोर्शी हा अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरुन फरार झाला.
सदर वाहनात देशी दारुच्या १३९ पेट्या व विदेशी दारुच्या ५ पेटया दिसुन आल्याने पोलीसांनी सदर दारुचा मुद्देमाल व वाहतुकीकरीता वापरलेले पिकअप वाहन असा एकूण १७ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल कारवाई करुन जप्त केला. संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे चामोर्शी येथे दिलेल्या तक्रारीवरुन कलम ३५३ भादंवि सहकलम ६५ (अ), १८(२), ८३ मदाका सहकलम १८४ मोवाका अन्वये आरोपी नामे शंकर अन्ना रॉय, राकेश मशीद व अमीत बारई यांचे विरुध्द गुन्हा नोंद करुन आरोपी नामे अमीत बारई यास अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधिक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे व अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथील पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि राहुल आव्हाड, पोउपनि दिपक कुंभारे, नापोअं अकबर पोयाम, पोअं प्रशांत गरफडे, श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके, मंगेश राऊत, सुनिल पुलावार, सचिन घुबडे, चानापोअं मनोहर येलम, शगीर शेख यांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here