हिक्केर जंगल पहाडीवर सी-60 जवान व 70 नक्षल्यांमध्ये धुमश्चक्री

0
35

– दोन लाखाचा इनामी एक जहाल नक्षली ढेर

गडचिरोली POST
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील गट्टा (जां.) हद्दीतील हिक्केर जंगल परिसरातील पहाडीवर सी- 60 जवान व 60 ते 70 नक्षलवाद्यांमध्ये आज सकाळी धुमश्चक्री उडाली. यामध्ये दोन लाख इनामी कंपनी दलमचा एक जहाल नक्षलवादी ठार झाला असून त्याचे मृतदेह पोलिसांनी हस्तगत केले आहे. समीर ऊर्फ साधु लिंगा मोहंदा, वय ३१ वर्षे, रा. तुमरकोडी, पोमकें कोठी, ता. भामरागड असे मृत नक्षलवाद्याचे नाव आहे. सोबतच पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षल स्फोटके व साहित्य हस्तगत केले आहे.                       हिक्केर जंगल पहाडावर 60 ते 70 च्या संख्येत असलेले नक्षलवादी कॅम्प लावून मोठ्या घातपाताची योजना आखत असल्याची माहिती सी-60 जवानांना मिळाली. या माहितीच्या आधारे जवानांनी सदर जंगल परिसरात नक्षल विरोधी शोध अभियान राबविले. या दरम्यान 1 एप्रिलच्या सकाळी 10 वाजताच्या सुमारास हिक्केर जंगल परिसरातील पहाडीवर दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलीस जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी पोलीसांनी नक्षलवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवुन शरण येणे बाबत आवाहन केले असता, नक्षलवाद्यांनी शरण न येता पोलीसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वरक्षणासाठी नक्षलवादयांच्या दिशेने गोळीबार केला. सदरची चकमक ही सुमारे 30 ते 45 मिनीटे चालु होती. पोलीसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, घटनास्थळावर एक पुरुष नक्षलवाद्याचा मृतदेह आढळून आला. मृत नक्षलीची ओळख पटली असून त्याचे नाव समीर ऊर्फ साधु लिंगा मोहंदा आहे.
सदर अभियान पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे , अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता व अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. सी-60 कमांडोच्या या शौर्यपुर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कौतुक केले. तसेच नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून सर्व नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण होऊन आपले जिवनमान उंचाविण्याचे आवाहन केले आहे.
ठार झालेल्या नक्षल्यावर 4 गुन्हे दाखल
समीर ऊर्फ साधु लिंगा मोहंदा या मृतक नक्षल्यावर आजपावेतो 2 चकमक व 2 इतर असे 4 गुन्हे दाखल असून त्यामध्ये पोस्टे भामरागड येथे सन – 2018 साली पोलीसांना जिवे मारण्यासाठी ॲम्बुश लावणे यासाठी देखील गुन्हा दाखल आहे. सदर नक्षली सन 2014-15 साली चातगाव दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन 2017 साली प्लाटुन क्र. 7 मध्ये भास्करचा सुरक्षा गार्ड होता. तसेच सन 2018 साली कंपनी 4 मध्ये कार्यरत होता व त्यानंतर कंपनी क्रमांक 10 मध्ये कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने 2 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
घटनास्थळावर मोठ्याप्रमाणात नक्षल साहित्य 
घटनास्थळावर 1 नग देशी बनावटीची रायफल, 1 नग भरमार रायफल, 1 नग 303 रायफल, ब्लास्टींगचे साहित्य, एसएलआर च्या 2 मॅगझिन व 30 राऊंड्स, 8 एम.एम.रायफलचे 3 राऊंड्स, 12 बोरचे 4 राउंड्स, 2 पिट्टु, भरपुर प्रमाणात नक्षल लिखाण साहित्य, 1 सॅमसंग कंपनीचा टॅब्लेट, 1 रेडिओ, रोख रक्कम रुपये 38,120 रुपये, नक्षल कपडे व ईतर नक्षल साहित्य हस्तगत करण्यात पोलीस दलास यश आले आहे. सदर जंगल परिसरात सी-60 पथकांच्या जवानांचे नक्षलविरोधी अभियान आणखी सुरु असुन, जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहिम राबविण्यात येत आहे. गडचिरोली पोलीस दलाकडुन गुन्हा नोंद करण्यासंबंधीची प्रक्रिया सुरु आहे. या घटनेची सविस्तर माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here