अंगणात खेळत असलेल्या बालकावर मोकाट कुत्र्याचा हल्ला

0
37

– कारसपल्ली येथील घटना

गडचिरोली POST
गडचिरोली : घरातील अंगणात खेळत असलेल्या एक वर्षाच्या बालकावर मोकाट कुत्र्याने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारला सकाळी 8 वाजताच्या सुमारास सिरोंचा तालुक्यातील कारसपल्ली (नारायणपूर) येथे घडली. रियांश असे जखमी बालकाचे नाव असून त्याच्यावर तेलंगाणा राज्यातील मंचेरियाल येथील दवाखान्यात उपचार सुरु आहेत.
प्राप्त माहितीनुसार, कारसपल्ली येथील राजेंद्र कडकरी हा व्यक्ती मिरचीची शेती करण्यासाठी तेलंगाणा राज्यात गेला आहे. त्याला पत्नी व रियांश हा एक वर्षाचा मुलगा आहे. रविवारला सकाळच्या सुमारास रियांशची आई त्याला घरातील अंगणात खेळण्यासाठी सोडून जेवण बनविण्यासाठी घरात गेली. यादरम्यान, अंगणात खेळत असलेल्या रियांशवर मोकाट कुत्र्याने हल्ला करून त्याच्या मानेला तोंडात धरले. यावेळी रियांशने आरडाओरड केल्याने त्याची आई व घराजवळील नागरिकांनी धाव घेतली. कुत्र्याच्या तावडीतून रियांशला सोडविले. मात्र कुत्र्याच्या हल्यात रियांश गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र प्रकती गंभीर असल्याने त्याला तेलंगाणा राज्यातील मंचेरियाल येथे रेफर करण्यात आले. विशेष म्हणजे, कारसपल्ली येथे कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी होण्याची ही तिसरी घटना आहे. या घटनेमुळे गावातील नागरिक चांगलेच भयभीत झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here