गट्टा दलमच्या एका जहाल नक्षलवाद्यास अटक

0
45

गंभीर स्वरूपाच्या 23 गुन्ह्यांमध्ये होता सहभाग
गडचिरोली POST
गडचिरोली. चकमक, खून, हत्या, जाळपोळ व दरोडा अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या गट्टा दलमच्या एका जहाल नक्षलवाद्यास अटक करण्यास गडचिरोली पोलिस दलाला यश मिळाले आहे. ही कारवाई सी-60 पथक, गट्टा पोलिस मदत केंद्राचे पोलिस जवान व केंद्रीय पोलिस बलच्या जवानांनी हाचबोडी जंगलपरिसरात अभियान राबवून पार पाडली. अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव साधू उर्फ काऱ्या उर्फ संजय नरोटे (31) रा. झारेवाडा ता. एटापल्ली असे आहे.
माहे फेब्रुवारी ते मे दरम्यान नक्षलवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान नक्षलवादी सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिस दलावर हल्ले करून शस्त्र लुटणे, रस्ते व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इत्यादी देश विघातक कृत्य करीत असतात. त्यामुळे पोलिस दल सुद्धा सतर्क राहून नक्षलवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. अशातच 17 एप्रिलला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस मदत केंद्र गट्टा (जां) हद्दीतील हाचबोडी जंगल परिसरात सी-60 पथकाचे जवान, पोंमके गट्टाचे जवान व केंद्रीय पोलिस दलाच्या जवानांनी संयुक्तरित्या नक्षलविरोधी अभियान राबविले. या दरम्यान जंगलात लपून बसलेल्या एटापल्ली तालुक्यातील झारेवाडा येथील रहिवासी साधू उर्फ काऱ्या उर्फ संजय नरोटे या जहाल नक्षलवाद्यास अटक करण्यात आली. संजय नरोटे हा सन 2015 पासून गट्टा दलममध्ये भरती होऊन सदस्य या पदावर कार्यरत होता. त्याने 28 मार्च 2023 रोजी नक्षल दलम सोडून तो घरूनच नक्षली कारवाया करीत होता. त्याच्यावर पोलिस पार्टीवर ऑम्बुश लावणे, जाळपोळ करणे, पोलिस व निष्पाप नागरिकांना जीवे ठार मारणे, दरोडा इत्यादी गंभीर स्वरूपाचे 23 गुन्हे दाखल आहेत. त्यात 12 चकमक, 2 पोलिस जवानांसहित एकूण 8 हत्या, दोन जाळपोळ व एक दरोडा यांचा समावेश आहे. त्याचा धुळेपल्ली – 2020, कोदुर-2020, टेकामेट्टा 2021, गोरगट्टा 2021, गुंडरवाही ऍम्ब्यूश 2020 या चकमकीमध्ये सहभाग होता. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने एकूण 2 लाख रुपयाचे बक्षिस जाहीर केले होते.
गडचिरोली पोलिस दलाने राबविलेल्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकूण 67 नक्षलवाद्यांना अटक करण्यात यश आले आहे. सदरची कारवाई पोलिस अधिक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधिक्षक अनुज तारे, अपर पोलिस अधिक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
बॉक्ससाठी…..
जिल्ह्यात केवळ 94 नक्षली सक्रिय : एसपी नीलोत्पल
सदर कारवाई संदर्भात पोलिस अधिक्षक नीलोत्पल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सध्या गडचिरोली जिल्ह्यात केवळ 94 नक्षलवादी सक्रिय आहेत. त्यापैकी 50 टक्के नक्षली छत्तीसगड राज्यातील आहेत. यामध्ये एक कंपनी दलम व सहा दलम कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात नक्षली भरती बंद आहे. यामुळे बाहेरील नक्षल्यांच्या भरोशावर जिल्ह्यात नक्षल हालचाली सुरु आहेत. नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असून नक्षलवाद्यांनी हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करावे व सन्माने जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here