एलसीबीने केली पोलिस भरतीतील पाच जणांना अटक

0
41

– नोकरीसाठी घेतला बोगस कागदपत्रांचा आधार
गडचिरोली POST
गडचिरोली : गडचिरोली चालक पोलीस शिपाई व पोलीस शिपाई भरती २०२१ या भरती प्रक्रियेत बोगस कागदपत्रांचा आधार घेऊन खाकी वर्दी अंगावर चढवण्याचे स्वप्न बघणाऱ्या ५ उमेदवारांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच गडचिरोली पोलिसांनी बीड येथे जावून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रात दर्शविलेल्या स्थावर मालमत्तेच्या संदर्भात माहिती घेऊन ही कारवाई केली आहे. या प्रकरणात मोठे रैकेट सक्रिय असण्याची शक्यता असून प्रकरणाच्या मुळापर्यंत तपास करून हे संपूर्ण रैकेट उघडकीस आणण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला निर्देश दिले आहेत.
पोलीस भरती प्रक्रियेची सुरवात नोव्हेंबर २०२२ पासून झाली असुन भरतीच्या कुठल्याही टप्यावर गैरप्रकार अथवा बेकायदेशीर मार्गाचा अवलंब केला जावु नये, याकरीता पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी वेळोवेळी उमेदवारांना तसेच सामान्य नागरीकांना आवाहन करून त्यांना कुठल्याही गैरप्रकाराबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ माहिती देण्याबाबत आवाहन केले होते. त्या अनुषंगाने भरती प्रक्रियेशी निगडीत येणाऱ्या प्रत्येक आक्षेपासंदर्भात पोलिस अधीक्षक जातीने लक्ष देवुन निराकरण करीत आहेत. दरम्यान, भरती प्रक्रिया अंतीम टप्यावर असतांना अचानक पोलीस अधीक्षक यांना निनावी पत्र प्राप्त झाले. सदर पत्रात सुरु असलेल्या भरती प्रक्रियेत व मागील पोलीस भरतीत देखील काही उमेदवारांनी प्रकल्पग्रस्ताचा समांतर आरक्षण घेण्याकरीता गडचिरोली येथील एका इसमाच्या मदतीने बीड जिल्ह्यातील खोट्या कागदपत्रांचे आधारे प्रकल्पगस्त प्रमाणपत्र हस्तगत करून पोलीस भरतीकरीता आवेदन अर्ज केला व मागील भरतीत त्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राचा लाभ घेवून नोकरी मिळविली आहे. सदर अर्जाचे गांभीर्य बघुन पोलिस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना बोलावून सदर अर्जाबाबत सखोल चौकशी करून तत्काळ योग्य कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केले.
पोलिस अधीक्षक यांचे आदेश प्राप्त होताच अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी व पोलीस उपनिरीक्षक दिपक कुमारे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक तयार करून चौकशी सुरु करण्यात आली. सदर चौकशी दरम्यान तात्पुरत्या निवड यादीत प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षणाखाली निवड झालेल्या ४ उमेदवारांचे प्रमाणपत्र हे बीड जिल्ह्यातील असल्याचे निदर्शनास आले. मागील भरती प्रक्रियेत प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षणाखाली निवड होऊन पोलीस दलात नवप्रविष्ठ पोलीस शिपाई म्हणून रुजु झालेल्या ५ उमेदवारांपैकी २ उमेदवारांचे प्रमाणपत्रे बीड जिल्ह्यातील असल्याचे दिसुन आले. सर्व प्रमाणपत्राची चौकशी पथकाने बारकाईने पाहणी केली तेव्हा असे निदर्शनास आले की, एकाच स्थावर मालमत्तेसंदर्भात दोन वेगवेगळ्या इसमांना प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणप्रत देण्यात आले होते. त्यातील एक नवप्रविष्ठ पोलीस शिपाई म्हणून रुजू झालेला होता तर त्यातील दुसऱ्याची सुरु असलेल्या पोलीस भरतीत तात्पुरत्या निवड करण्यात आली होती. यावरून पोलीसांचा अधिकच संशय बळावल्याने त्यांनी बीड येथे जावून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रात दर्शविलेल्या स्थावर मालमत्तेच्या संदर्भात माहिती घेतली. तेव्हा मोठ्या प्रमाणात तफावत दिसुन आली. एकंदरीत स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या चौकशी दरम्यान सदर प्रमाणपत्रे बोगस असल्याची खात्री होताच पोलीस उपनिरीक्षक दिपक कुंभारे यांच्या लेखी फिर्यादेवरुन गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.
पोलिसांनी केलेल्या तपासात प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षणाखाली नवप्रविष्ठ पोलीस शिपाई म्हणून रुजु झालेल्या २ आरोपीतांना तसेच तात्पुरत्या यादीत प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षणाखाली निवड झालेल्या ३ आरोपीतांना अटक करण्यात आली आहे. भविष्यात मोठ्या प्रमाणात खोट्या कागदपत्रांचे आधारे प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र प्राप्त करुन शासकिय नोकरीचा लाभ घेतल्याची बाब निष्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर प्रकरणाच्या मुळापर्यंत तपास करून हे संपूर्ण रैकेट उघडकीस आणण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला निर्देश दिलेले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या नेतृत्त्वात पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, पोलीस उपनिरीक्षक दिपक कुंभारे, राहुल आव्हाड, पुरुषोत्तम पाडगुरे, पोहवा नरेश सहारे, हेमंत गेडाम, पोना सतिश कत्तीवार, राकेश सोनटक्के, दिपक लेनगुरे, अकबर पोयाम, गवई, माणिक दुधबळे, सुनिल पुाधार, मंगेश राऊत, सचिन घुबडे, श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके, सुरेश वट्टी, प्रशांत गरकडे, पंकज भगत, लीला सिडाम, शेवंता दाजगाये, पुष्पा कन्नाके, सोनम जांभुळकर, शगीर शेख, मनोहर टोगरवार यांनी केली.
आरोपींकडून गुन्ह्याची कबुली
प्रकल्पग्रस्त या समांतर आरक्षणाचा लाभ घेतलेले नवप्रविष्ट पोलीस शिपाई व निवड झालेले उमेदवार यांना विश्वासात घेवून विचारपुस केली असता, त्यांनी त्यांचे कुठलेही पुर्वज बीड जिल्ह्यातील रहिवासी नसतांना किंवा तेथील कुठलीही स्थावर मालमत्ता शासनाने प्रकल्पाकरीता संपादित केली नसतांना देखील खोट्या कागदपत्रांच्या आधारे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र तयार करण्यात आले असल्याची कबुली दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here